Saturday, October 18, 2014

समाधानाने भरलेला सिनेमा....

       हल्ली चित्रपट पहिला कि उर समाधानाने भरावा असे चित्र अत्यंत दुर्मिळच. आजचा चित्रपट हा ‘सिनेमा’ या व्याख्येला कमी आणि ‘व्यवसाय’ या व्याख्येला अधिक जवळ करतो. आजच्या सिनेमाचे हे रूप पाहता केवळ बॉक्सऑफिस वर ‘गल्ला’ जमणारा सिनेमा म्हणजे ‘यशस्वी’ सिनेमा हे समीकरण व्हायला सुरुवात झाली आहे. मग भीती वाटू लागते कि काय असेल सिनेमाच भवितव्य?. अभिजात दृष्टीने सिनेमाकडे पाहणं संपून जाईल का? मुळात असे सिनेमे निर्माण तरी होतील का? या कलाकृतीतून समाजाला काहीतरी देता येईल का? कि केवळ ‘शतकी करोड क्लब’च्या खाणखणाटात अभिजात सिनेमा दडून जाईल? असे नानाविध प्रश्न उभे राहतांना एक सिनेमा येतो आणि या प्रश्नांना छेद देऊन जातो. अर्थात तो सिनेमा म्हणजे डॉ. प्रकाश बाबा आमटे.
सिनेमा काय आणि कसा आहे हे ठरवतांना प्रामुख्याने जे निकष आपण लावतो ते अत्यंत महत्वाचे असतात. मुळात एक सिनेमा जेव्हा प्रेक्षकांसमोर येतो तेव्हा तो काहीच लोकांना समाधान देवून जातो. मात्र हा सिनेमा निर्मात्याला, दिग्दर्शकाला, त्यातील कलाकारांना आणि सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांना सर्वांनाच एकाचवेळी समाधान देतो. प्रेक्षक सोडून इतरांना हे समाधान कि आपण काहीतरी प्रेक्षकांना देऊ शकलो आणि प्रेक्षकांना हे समाधान कि इतक्या अथांग सागराला प्रत्यक्षात नाही मात्र पडद्यावर थोडे तरी अनुभवता आले. हा सिनेमा बनवतांना डॉ. आमटे आणि कुटुंबीयांची मानवतेसाठीची धडपड लोकांसमोर यावी हाच हेतू होता. त्यामुळे जर या चित्रपटाद्वारे ते शक्य झाले तरच हा सिनेमा उत्तम असा निकष इथे लागू होतो. मुळात असे प्रासंगिक निकष प्रत्येक चित्रपटासाठी लागू होतात. या सिनेमात अखेरच्या प्रसंगात डॉ. आमटे जेंव्हा मंदाताईंना विचारतात कि तुला काय मिळालं माझ्या सोबत राहून? तेव्हा त्या म्हणतात कि ‘जगण्याचं समाधान!’. त्याचं उत्तर म्हणजे जणू त्यांच्या आणि अर्थात आपल्याही आयुष्याचे सार सांगून जातो.
सिनेमाची सर्व बाजूंनी भट्टी चांगली जमवली आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाची कथा ही अशी आहे कि चित्रपट केवळ या कथेवर सहज चालू शकतो. डॉ आमटेंचे कार्यचं इतकं मोठ्ठ आहे आणि ते पडद्यावर आणखी भव्य दिसतं. समृद्धी पोरेंना अपेक्षित असलेला सिनेमा त्या पहिल्या प्रयत्नातच बनवू शकल्या हे कौतुकाच आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी अत्यंत व्यवस्थित पार पडली. चित्रपट ज्या प्रमाणे मनाला आनंद देतो तसाच पाहतांना देखील डोळ्याला आनंद देतो. महेश अन्ये यांनी सिनेमेटोग्राफीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. चित्रपटातील दृश्ये भावनाप्रधानतेला महत्व देणारी वाटतात. अशा सिनेमात सिनेमेटोग्राफीत अनेक वेगळे प्रयोग करण्याचे धाडस देखील त्यांनी केले. सिनेमाचे संवाद ही खरेतर सगळ्यात जमेची बाजू म्हणता येईल. काळजाला हात घालणारे संवाद या सिनेमात अत्यंत कुशलतेने पेरले आहेत. अनेकदा प्रसंगाची गंभीरता एका उच्च पातळीवर नेवून ठेवणारे संवाद यात दिसतात तर दुसर्या बाजूला गंभीर वातावरणात मिश्किलपणे हास्य देखील उमटवणारे संवाद सापडतात. विषयाची व्याप्ती अर्थात मोठ्ठी असल्याने ते शक्य झाले असावे.
अखेर बाजू राहते ती अभिनयाची. अर्थात नाना पाटेकर पडद्यावर असतांना आपण इथे कुठेतरी फुटपट्टी घेऊन सांगण म्हणजे मूर्खपणाच ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी बाबा आमटे पडद्यावर उतरवण्यात नाना यशस्वी झाला आहे. चित्रपटातील नेगेल या बिबट्याच्या मृत्युवेळचे दृश्य नानाने भलत्याच ताकतीने पेलले. त्या दृश्यातील त्याचा बाज हा डॉ आमटे आणि नाना दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे विसरायलाच लावतो. नेगेल जणू आपलेच मूल आहे असा तो आक्रोश त्याने जिवंत साकारला. दुसरी बाजू म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने आजवरच्या आयुष्यातील सगळ्यात आव्हानात्मक भूमिका बजावली असे वाटते. मंदाताई साकारण्यात ती यशस्वी  झाली आहे. काही प्रसंगात नानाला मागे टाकण्याची किमया तिच्याकडून यंदा घडली. मुलगी आरतीला घेऊन जाण्याचा प्रसंगात तिने एका आईला अक्षरशः जिवंत केले असेच म्हणावे लागेल.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच मांडलेले नक्षलवादाचे चित्र अत्यंत चपखल बसले आहे असे म्हणता येईल. तेथील आदिवासींची भ्रष्ट अधिकार्यांकडून होणारी पिळवणूक काळजाचा ठाव घेऊन जाते. भव्यता दाखणारे दृश्य पडद्यावर उतरवण्यात पोरे यशस्वी ठरल्या आहेत. एकूण पाहता सिनेमा तांर्तिक बाबतीत तितका गरुडझेप घेत नसला तरी तो सिनेमा म्हणून सर्व आघाड्यावर यशस्वी वाटतो. तांत्रिकदृष्टीकोनाची मोजपट्टी इथे लावणे योग्य नाही हे जगजाहीर आहे. उत्तम सिनेमा म्हणूनच याच्याकडे पाहावे असे वाटते.
 

No comments:

Post a Comment