Friday, July 31, 2015

जेव्हा फाशीलाही रंग चढू लागतो...

स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खूपच कमीवेळा किंवा अत्यंत दुर्मिळ समयी संपूर्ण देश एकाच रंगात रंगलेला दिसला आहे. आजवर मानवतावादी विचारसरणीची परंपरा वर्षानुवर्षे देशाने अभिमानाने जपली आहे. कधी काळी याच देशात धर्माधर्मातील विविधतेतून एकता प्रस्थापित कशी करायला हवी याचा संदेश समस्त जगाला दिला आहे. पण आपण कधीकधी हे सुद्धा विसरतो कि असाही कधीतरी माझा देश होता. धर्मांधतेच्या अंधारात आपल्या धमन्यांमधील रक्ताचा रंग बदलायला सुरुवात होते आणि शेवट सुद्धा त्याच अंधारात कुठेतरी अडगळीत होतो. १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनला काल त्याच्या कुकर्माची फळे मिळाली अशी हेडलाईन प्रत्येक वृत्तवाहिनीवर धडाडत होती.
      खरतरं त्या हेडलाईन पाहून ऊर भरून आला, समाधानाने डोळे पाणावले. धर्माच्या आडाणे म्हणा वा इतर कुठल्याही कारणाने म्हणा पण इथे जन्माला येऊन अशी कुकर्म करणाऱ्यांची संख्या देशात बोटावर मोजण्या इतकीच आहे. याकुबला देहांताची शिक्षा म्हणजे त्याचच एक उदाहरण आहे. आपल्या सुदैवाने अशी फाशी झालेल्या गुन्हेगारांची संख्या खूपच कमी आहे म्हणजेच इथे खूपच कमी लोक कुकर्म करतात किंवा ज्यांना फाशी झाली नाही त्यांनी म्हणावी तितकी कुकर्म केली नव्हती. मग अशा लोकांची तर खूपच नाव आहेत. याकुब मेमन हा गुन्हेगार होता यात तिळमात्रही शंका असण्याचं कारण नाही, तो मुंबई बॉम्बस्फोटातील २५७ निरपराध जीवांचा हत्यारा होता हे सुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे, त्याला शिक्षा होणं हाच त्या बळी गेलेल्या निरपराधांना न्याय मिळवून देणं आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्यांना न्याय मिळवून दिलाय. इथल्या न्यायव्यवस्थेने २२ वर्षांनी का होईना पण न्याय मिळवून दिला.
      निश्चितपणे या केसची दाहकता सर्वाधिक होती. त्यामुळे जनमताचा रेटा देखील तितकाच प्रभावशाली होता. पण याची दुसरी बाजू देखील विचार करायला लावणारी होती. याकुबला पकडल्या नंतर तो माफीचा साक्षीदार म्हणून शरण आला, त्याने आपल्या तपास यंत्रणांना सर्व सहकार्य केले, स्वतःच्या भावाविरोधात पुरावे दिले, गुन्हा कबूल करून संपूर्ण गुन्ह्याची माहिती दिली. मग एवढे सगळे झाल्यावर अजून त्याला माफीचा साक्षीदार मानायचा नाहीच पुन्हा वर त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवायच्या होत्या. कि सरकार अथवा तपास यंत्रणांना त्याने स्वतः जाऊन या हल्ल्याचा खरा सूत्रधार टायगर मेमनला जिथे असेल तिथून पकडून आणून भारताच्या हवाली करायचे असे अपेक्षित होते आणि तेव्हा मग त्याला आपण माफीचा साक्षीदार घोषित करणार होतो का? जर हीच अपेक्षा होती तर मग आपल्या तपास यंत्रणा काय कामाच्या आहेत? मुळात गेली अनेक वर्षे टायगर हाती लागत नाहीये, दाऊद इब्राहिम कुठे आहे, काय करतो, काय खातो याची इतंभूत माहिती असताना देखील पकडलं जात नाही त्याचा कोण विचार करायचा? याकुबला फाशी देऊन आम्ही आमचं देशप्रेम सिध्द केल आहे असा डंका वाजवायची काहीच गरज नाहीये. खरच देशप्रेम सिध्द करायचं असेल तर पाकिस्तानात जाऊन दाउद, टायगर, हाफिज सईदला पकडून आणायची धमक आपण का दाखवत नाही? तिथे का आम्ही पाकिस्तानच्या विनवण्या करत बसतो कि त्यांना आमच्या ताब्यात द्या? आपण नको त्या ठिकाणी अमेरिकेचं खूप कौतुक करत असतो, त्यांनी पाकिस्तानात घुसून ओसामाला शोधून यमसदनी धाडलं हे का विसरतो? इथे नाही का आठवत देशप्रेम? इथे का ५६ इंची छाती थिटी पडते?
      पिंजऱ्यात सापडलेल्या उंदराला फासावर लटकवून आपला यशाचा झेंडा फडकवण्यात कसला पुरुषार्थ? मुळात त्याने २० वर्षे जेलमध्ये काढली होतीच, आधीच अर्धमेल्या झालेल्याला पूर्ण मारून काय साध्य केलं? त्यापेक्षा त्याला आयुष्यभर कैदी बनवून सडवत ठेवलं असतं, तर एक दिवस त्यानेच फाशीची याचना केली असती तर आपली सुडाची भावना तरी नीट पूर्ण झाली असती. असाही याकुबच्या फाशीमागे न्याय कमी आणि सूड अधिक वाटत होता. सर्वांना समान न्याय ही संकल्पना तर केवळ राज्यघटने पुरती मर्यादित आहे कि काय असे वाटू लागले आहे, तसे नसते तर मुंबई साखळी स्फोटाला कारणीभूत असलेली बाबरी मशीद प्रकरणातील आरोपी अजून न्यायपालिकेच्या नजरेत आलेलेच नाहीत, ते कसे? श्रीक्रुष्ण आयोगाच्या स्पष्ट अहवालानंतर देखील ना कॉंग्रेस ना भाजप सरकारच्या छातीमध्ये तेवढा दम आहे कि त्यातील आरोपींना शिक्षा सोडा पण अटक करता येईल? जे आजही छाती ठोकून बाबरी पडल्याचा अभिमान सांगतात त्यांच्या पुढे का आम्ही बांगड्या घालतो? तिथे कुठे जाते ही देशसेवा आणि देशप्रेम? गुजरात जातीय दंगलीमध्ये हात धुऊन घेतलेले आरोपी शिक्षेपासून वंचित का राहतात? तिथे तर २५७ पेक्षा कितीतरी अधिक निरपराध सर्वांसमक्ष बळी गेले. ते कुकर्म नव्हतं तर काय सत्कर्म होतं? मालेगाव बॉंबस्फोटाच्या आरोपींकडे का अजून लक्ष जात नाहीये? तिथे का डोळे झाकले जातात? इथेच वेळ काढूपणा का अवलंबला जातो? इथेच नेमका मग धर्माचा वास यायला सुरुवात होते. जाणीवपूर्वक बचावाचा पवित्रा का घेतला जातो?
      दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधीच्या हत्येतील आरोपी म्हणून सिध्द झालेले फाशीच्या शिक्षेवरून जन्मठेपेमध्ये कसे ओढून आणले जातात? का तर त्यांना राजकीय पाठबळ मिळतंय म्हणून? म्हणजे देशप्रेमाचा झेंडा राजकीय खेचाखेचीत सोयीनुसार गुंडाळून ठेवला जातो तर. भाजपला देशप्रेमाचे खूप फेफरे येतात, मग काश्मीर मध्ये फुटीरवाद्यांच्या हातात हात देणाऱ्या पीडीपी पक्षासोबत खांद्याला खांदा लावून सरकार बनवताना हे आठवत नाही का देशप्रेम? भाजपच काय इथला प्रत्येक पक्ष सोयीनुसार राजकारण खेळतो, तो काँग्रेस असो कि आणखी कुणी. सगळे इथून तिथून सारखेच. यांना गरज पडते तेव्हा देश आठवतो, नाहीतर इतर वेळी यांचा आपला आरोपांचा एकमेकांवरील देवाणघेवाण कार्यक्रम चालूच असतो.

      मुंबई बॉम्बस्फोटातील इतर १० आरोपींना कशासाठी जन्मठेप दिली जाते? त्यांच्यासाठी का फाशी लागू होत नाही? देशाचे थोर सुपुत्र संजय दत्तला याकुबच्या आधी फाशी द्यायला हवी होती. केवळ कुटुंब एका पक्षाशी निगडीत आहे म्हणून त्याला वेगळ्या नजरेने पाहण्याची काय गरज पडते? पाकिस्तान आणि आयएसआय च्या विरोधात धाडणाऱ्या बाळासाहेबांच्या तोफा नेमक्या या संजय दत्तच्या पाठीशी कशा उभ्या राहतात? देशप्रेम, राष्ट्रवाद असले शब्द तेव्हा हवेतच विरघळलेले असतात. वर अजून देखील हा बाबा तर आपले चित्रपट चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी जेल मधून मजेत सुट्ट्या घेऊन बाहेर पडतो. अर्ज न करताही या महाभागाला दया दाखवली जाते. इथे यांना मानवतावादी दृष्टीकोण बरा सापडतो. मग याकुब एकटाच का दोषी धरला जातो? या बाकीच्यांनी काही अपराध केलेलेच नाहीत कि काय अशी शंका येते. याकुबच्या फाशीलाच फक्त मग कुठला वेगळा रंग दिला गेला होता का? आणखी किती दिवस हे असे झेंड्यांच्या रंगांचे खेळ हा देश पाहणार आहे? आणखी किती दिवस न्यायापुढे सर्व समान ही फक्त संकल्पना म्हणून राज्यघटनेतील ओळ बनून राहणार आहे हे भारत भाग्य विधाताच जाणो.