आजुबाजूच्या
माणसांवरचा विश्वास उडाला की माणूस आपल्यातल्या आत्म्याला गोंजारायला सुरु करतो.
अनेक प्रश्न तेंव्हा सुया बनतात आणि आतल्या आत्म्याला टोचायला लागतात, अशावेळी तो
जे म्हणेल, तो जे सांगेल त्यावर विश्वास ठेऊन माणूस कृती करतो. तुमच्या आमच्या
सारख्या सामान्य माणसाचं हे असं गणित असतं. पण राजकारण्यांमधला अंतरात्मा जरा हटके
असतो. त्यांचा अंतरात्मा त्यांच्या आत नसतोच, तो कधी आजूबाजूला, कधी डाव्यात, कधी
उजव्यात, कधी या पलीकडेही, तर कधी विरोधी पक्षातही असतो. उदाहरणार्थ अगदी ताजी
घटना म्हणजे तत्ववादी राजकारणी आणि बिहारचे (परवा संध्याकाळी तीन तासांपुरते) माजी
आणि तिथून पुढे पुन्हा आजी मुख्यमंत्री नितीशकुमार. हे असतात बिहारच्या पाटण्यात
आणि यांचा अंतरात्मा दिल्लीतल्या प्रधानसेवक कार्यालयात आहे. यादवांच्या छळाने
गदगदून गेलेल्या नितीशकुमारांनी अंतरात्म्याचा सल्ला ऐकत राजीनामा दिला आणि बिहारच
नव्हे तर देशभरात राजकीय भूकंप घडवून आणल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर धडाडू
लागल्या.
वास्तविक हा राजकीय भूकंप होता की नाही
याबाबत अनेक मते आहेत. कारण हा केवळ सामान्य जनतेसाठी आणि या जनतेला दाखवायचा
म्हणून माध्यमांसाठी (दिखाऊ) भूकंप होता. अन्यथा राजकीय अभ्यासक, विश्लेषक,
माध्यमातले अनेक राजकीय पत्रकार, संपादक आणि खुद्द तमाम राजकारणी यासगळ्यासाठी
ग्राह्य असलेली घटना होती. जनता सोडता वरील प्रत्येक घटकाला ही राजकीय भाकरी
फिरणार हे अठरा महिन्यापूर्वीच माहित होते. हो अगदी अठरा महिन्यांपूर्वीच हे
उघडपणे दिसत होतं की आज ना उद्या गठबंधन तुटणार. अठरा महिन्यांपूर्वी बिहारच्या
निवडणुकांमध्ये जनतेने देशभर उसळत असलेली मोदी लाट परतवत तगडा निकाल दिला. या
निकालाच्या बळावर ७१ आमदारांसह जदयु नेते नितीशकुमार मुख्यमंत्री म्हणून खुर्चीत
स्थिरावले. त्यांची मुख्यमंत्रीपदी पाचव्यांदा वर्णी लागली होती. सत्ता
स्थापनेसाठी लागणारी आकड्यांची जुळवाजुळव लालू यादवांच्या राजद आणि कॉंग्रेस (राहुल
गांधींची कॉंग्रेस म्हणावं की नाही? हेच कळत नाही) या दोन पक्षांना घेऊन केली. लालूंकडे
८० आमदार संख्या असतांनाही मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं.
कशी बशी सत्ता स्थापन झाली परंतु या
निवडणुकीकडे मागे वळून पाहिलं तर अगदी धक्कादायक चित्र दिसतं. आज भाजप आणि
संघाच्या कडेवर जाऊन बसलेले नितीशकुमार मुख्यमंत्री झाले ते नेमक्या उलट गणितावर.
हे गणित म्हणजे बिहार भाजपमुक्त नारा. निवडणुकीमध्ये भाजपमुक्त बिहारचे स्वप्न
दाखवली आणि जनतेने त्या मुद्द्यावर यांना मते दिली. हिटलरशाही, धार्मिक तेढ बिहार
मध्ये नको असे बाण मारत, भाजपला नामोहरण (भक्तांनो नमोहरण नव्हे) करत त्यांनी बाजी
मारली. पण ती केवळ अठरा महिन्यांपुरतीच. अठरा महिन्याच्या संसाराचा काडीमोड करत,
नवा संसार थाटला गेला. कारण केवळ एकच (तेही नितीशकुमारांनी माध्यमांमध्ये
सांगितलेलंच) लालूंचे सुपुत्र तेजस्वी यादवांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप. तेजस्वी
हे बिहारचे उपमुख्यमंत्री, भ्रष्टाचार हा कौटुंबिक वारसा त्यांनीही जपून ठेवला
त्यात नवल ते काय? यादव कुटुंब (लालूंचे) आणि घोटाळा हा जणू समानार्थी शब्द आहे
असेच वाटते. यादव राजीनामा देण्याची सुतरामही शक्यता नाही हे कारण पुढे करत
नितीशकुमार पायउतार झाले. बरं गम्मत ही की माझ्या तत्वानुसार भ्रष्टाचारी
लोकांच्या सरकार मध्ये मला माझी तत्वे राहू देत नाहीत म्हणून मीच वेगळा होतो अशी
आवई उठवत पद सोडले. पण प्रश्न हा की घोटाल्याच हे प्रकरण २००४-२०१४ या दरम्यानच,
म्हणजे अठरा महिन्यापूर्वीच्या सत्ता स्थापनेआधीच, आरोप तर तेव्हापासून होते. म्हणजे
लालू रेल्वेमंत्री होते तेव्हा पासून. पण गठबंधन करतांना यांची भ्रष्टाचार विरोधी तत्वे
कदाचित स्लीपिंग मोड वर असावीत किंवा त्यावेळी तत्वे सायलेंट केली असावीत. कारण
तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळवणं केवळ यादवांना जवळ केल्याशिवाय शक्य नव्हतं. मग आजच
हा सायलेंट मोड जाऊन लाउडस्पीकर मोड का घेतला?
खरतरं हा अचानक आलेला यु टर्न नाही, या
सिनेमाचं पटकथा लेखन तीन-चार महिन्यापासून सुरु झालेलं. प्रचारात घेतलेली भाजप
विरोधी भूमिका बदलत, सत्ता भाजप सोबत स्थापन करणे तेव्हा अशक्य होते. म्हणून रडत
खडत संसार सुरु केला. दरम्यान त्या काळात भाजप सोडून काँग्रेस आणि डाव्या
विचारसरणीच्या सर्व नेत्यांना २०१९ च्या निवडणुकांमध्ये मोदीविरोधी आघाडी निर्माण
करत रणनीती आखायची होती. यातला मोदींचा पर्यायी चेहरा म्हणून नितीश एकमेव उत्तर या
महाआघाडीकडे होते. त्या दिशेने मोट बांधायचं काम देखील सुरु होतं. नितीशकुमारांची
पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा कधीही लपली नव्हती, याचाच फायदा इतर पक्षांना आणि
खुद्द नितीशकुमारांनाही घ्यायचा होताच. परंतु हळूहळू भाजपमय होत जाणारा भारत आणि
आपल्या वयाची चाहूल लक्षात घेत नितीशकुमारांना ते पद आवाक्याबाहेरच वाटू लागलं.
२०१९ ची मोदी आणि भाजपची दावेदारी मजबूत होण्याची चिन्हे दिसतांना त्यांच्यातला
खुर्चीत जगणारा आत्मा थोडासा डळमळू लागला. बर दुसरीकडे बिहारमध्ये पुढच्या वेळी
लालू मुख्यमंत्रीपद नितीशकुमारांकडेच ठेवतील याची शक्यताही धूसर वाटू लागली. ना घर
का न घाट का अशी परिस्थिती ओढवेल की काय अशी भीती देखील त्यांना वाटू लागली. दिल्लीतलं
सिंहासन नसेना पण भाजप सोबत चूल मांडत किमान बिहारचे सिंहासन आपण पुढच्याही
निवडणुकांमध्ये कायम राखूया या सात्विक भावनेने त्यांना पछाडलं.
एकीकडे संपूर्ण भारत भाजपमय होत असतांना
बिहार हातातून गेल्याचं दुःख मोदी-शहांना स्वस्त बसू देण शक्यच नव्हतं. काहीही
करून इथे परिवर्तन आणणं गरजेचं वाटू लागलं. यातूनच मग पडद्यामागे साटेलोटे,
घोडेबाजाराच्या बैठका घडू लागल्या. राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी सर्व मार्ग वापरावे
लागतात, तेच होऊ लागलं. यात भर म्हणून टाईम्स नाऊ मधून एक्झिट घेतलेले अर्णव
गोस्वामी यांच्या नव्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीची रचना झाली. या
वाहिनीच्या मालकी हक्कात एक भाजप खासदार आपला आधार लावून होते, त्यामुळे अनेकांच्या
भुवया उंचावल्या होत्या. कारण अर्णव गोस्वामी आणि भाजप खासदार एकत्र म्हणजे
पूर्वेचा सूर्य पश्चिमेला असाच अर्थ. या वाहिनीचा पहिलाच शो म्हणजे एक बॉम्बस्फोट
होता (हा योगायोग म्हणावं की शुभारंभयोग), लालू आणि कुविख्यात शाहबुद्दीन
यांच्यातील संभाषणाच्या रेकॉर्डिंगचे भांडवल करत लालूंचे वस्त्रहरण करण्यात आले.
खरतरं त्याच दिवशी माझे सहकारी पंडित आणि माझे बोलणे झाले की लालूंची गेम सुरु
झाली. भाजपप्रणीत ही खेळी नितीशकुमारांना काहीच माहित नव्हती असे समजणे अत्यंत
बावळटपणा ठरेल. दरम्यान मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर असा खेळ जदयु आणि
भाजप यांत सुरु झाला. लालुंमुळे बिहार आणखी खराब होतोय, क्राईमरेट वाढत जातोय,
लालूंनी महत्वाची आठ खाती स्वतःकडे ठेवलीय अशा एक ना अनेक आरोळ्या भाजपने ठोकायला
सुरुवात केली, यात मध्येच पुन्हा चारा घोटाळ्याच्या केसला हवा दिली गेली, मध्येच
लालूंच्या घरावर सी.बी.आय.चे छापेमार सुरु झाली. आयआरसीटीसीच्या दोन हॉटेलची केस
नव्याने चघळली जाऊ लागली. इतके सारे घडत असतांना नितीश मात्र स्वस्त बसून होते, ते
केवळ वाट पाहत होते योग्य वेळेची. (आणखी एक योगायोग) मागच्या आठवड्यात ईडी आणि
सीबीआय ने १२ ठिकाणी छापे टाकत लालूंची पुरती नाकेबंदी करून टाकली आणि हीच योग्य
वेळ साधत नितीशकुमारांनी आपले शस्त्रे बाहेर काढली. तेजस्वी यादवांचा बहाणा करत
सरकारमधून काढता पाय घेतला.
बिहारच्या भल्यासाठी या गोंडस नावाखाली या
घटनेला कुरुवाळू लागले. त्यांनी राजीनामा दिल्या दिल्या ट्विटरचे जगातील सर्वोत्तम
वापरकर्ते आणि प्रधानसेवक नरेंद्रजी मोदी यांनी नितीशकुमारांचे ट्विटरवरून
अभिनंदनही करून टाकले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईचे कौतुक केले आणि एका अर्थाने आपला
नितीशकुमारांना, (नव्या सरकारला?) पाठिंबा जाहीर केला. नितीशकुमारांना
भ्रष्टाचाराचा खूप तिटकारा आहे असा समज कृपया करून घेऊ नका. त्यांचेच गुरु जॉर्ज
फर्नांडीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांना अंतरात्म्याचा आवाज
ऐकू आला नाही. शिवाय लालूंच्या गुंडप्रवृत्तीचे शाहबुद्दीन खासदारांचे वावडे
असणाऱ्या नितीशजींना आपल्याच पक्षातले तमाम जवळचे सगेसोयरे गुंड नेते चालतात हा
निराळाच योगायोग. त्यामुळे त्यांचा अगदी स्वच्छ प्रतिमेचा उदोउदो हा केवळ बनाव
आहे. लालू, भुजबळ आणि असे विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी नेते या सर्वांसाठी अत्यंत
प्रामाणिकपणे काम करणारी (आणखी एक योगायोग) ईडी आणि सीबीआय मात्र मध्यप्रदेशातील
व्यापम भ्रष्टाचाराची, राजस्थानच्या वसुंधराराजेच्या भ्रष्टाचाराची कित्येक महिने
केवळ चौकशीच करते. इथे मात्र प्रधानसेवक गप्प राहणे पसंत करतात. भाजप वर होणारे
भ्रष्टाचाराच्या आरोपांना पत्रकारांसमोर सोडाच पण त्यांच्या ट्विटर वरूनही कधी
उत्तर दिले नाही. मात्र नितीशकुमारांच्या भ्रष्टाचाराविरोधी लढ्याचे अभिनंदन तेवढे
गडबडीत केले. हमारा भ्रष्टाचार तुम्हारे भ्रष्टाचार से छोटा हे दाखवण्यात सध्या
भाजप व्यस्त असल्याने कदाचित त्यांचे लक्ष नसावे. तत्पूर्वी मोदींच्या नोटबंदी
सारख्या अनेक निर्णयांना जाहीर पाठिंबा देत, आपली छुपी मनीषा त्यांनी जाहीरच केली.
सगळ्यात मोठा योगायोग म्हणजे परवा
संध्याकाळी नितीशकुमारांनी केलेल्या राजीनाम्यावरील सहीची शाई वाळते न वाळते एवढ्यात,
अवघ्या अर्ध्या तासांत भाजपचे आमदार संख्याबळ जमवण्यासाठी थेट नितीशजींच्या
निवासस्थानी गोळा झाले. कदाचित जगाच्या पाठीवर कुठे घडेल न घडेल असा अजब राजकीय
योगायोग पुढे घडला. राजीनामा दिल्यानंतर अवघ्या तीन तासात नितीशकुमारांनी भाजपच्या
पाठींब्याने नवीन सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांना सादर केला. अवघ्या तीन तासात बिहारचे
जदयु-राजद-कॉंग्रेस सरकार हे जाऊन त्याजागी बिहारचे जदयु-भाजप सरकार प्रस्थापित
झाले आणि काही तासांत ‘अर्थ’पूर्ण सलोखा जपणाऱ्या वृत्तवाहिन्या बिहारचा नवा एक्झिट
पोल घेऊन उभ्या राहिल्या. नितीशकुमारांनी घेतलेला निर्णय बिहारी जनतेला किती योग्य
वाटतो याचे विश्लेषणकरू लागल्या. माध्यमांना हाताशी धरत होत्याच नव्हतं करण्यात पटाईत
झालेल्या भाजपला हा खेळ अवघड तो काय?
नितीशकुमारांचा हा प्रताप काही नवा नाही.
समाजवादी विचारसरणीच्या बुरख्याखाली त्यांची सत्तालालसा वृत्ती नवी नाही.
यापूर्वीही समाजवादी झेंडे खांद्यावर घेवून एनडीए ला पाठिंबा दिला आणि रेल्वे
मंत्रिपद खिशात घातले होते. जदयु चा वारसा त्यांनी पुढे चालवला. याधीही त्यांचेच
गुरु जॉर्ज फर्नांडीस यांनीही समाजवादी बुरख्यात हेच केले, त्यांचेही गुरु लोहिया
यांनी जनसंघाला सोबत घेत बडी आघाडी नावाखाली अजब समाजवाद जोपासला. त्यामुळे
समाजवादी चेहऱ्याचे ढोंग करत धर्म आधार मानणाऱ्या संघाच्या ताटाला ताट लावत
सत्तेच्या पंगतीत जाण्याचा प्रताप त्यांनी वारसाहक्काने कायम ठेवला एवढंच. फक्त
यंदा त्यांना तत्वाविरोधात सत्तेत न बसण्याचा, (कदाचित गो-अमृत शिंपडलेला) पवित्र
सल्ला आणि आमंत्रण देणारा अंतरात्मा त्यांच्या आत नव्हता तर हा अंतरात्मा
दिल्लीस्थित प्रधानसेवक कार्यालयात होता इतकाच काय तो योगायोग.