विधानसभा निवडणुकीची उत्सुकता ही लोकसभा निवडणुका
संपल्या आणि निकाल लागले तेव्हा पासून लागून राहिली होती. आजवर पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना
हुरहूर लागत असे मात्र यंदा सामान्य जनतेला देखील ही हुरहूर लागून राहिली आहे. ज्याला त्याला जळी, स्थळी,
काष्टी, पाषाणी केवळ निवडणूक, निवडणूक आणि निवडणूक दिसतेय. जो तो उठतोय आणि याच धुळीत पडतोय. लोकसभा संपली आणि तिचा निकाल आला तेव्हा बऱ्याच
प्रस्थापित मंडळींना घरात बसावे लागले.
अर्थात महाराष्ट्राचा विचार केल्यास त्यावेळी सत्तास्थानी असलेल्या मात्तब्बरांना
धोबीपछाड मिळाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची खूपच वाताहत झाली. त्यामुळे मतदार राजाला खरोखर आपण राजा झालो असा
काहीसा 'फिल' झाला. हा निकाल अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला त्यामुळे
तिथूनच आगामी निवडणुकांचे (विधानसभा)
पडघम वाजायला सुरुवात झाली. महायुतीची नवी मोट चालवणाऱ्यांनी त्याचवेळी विजयाचे
बिगुल वाजवून दिले. आमचाच विजय पक्का अशी आरोळी सुद्धा ठोकून दिली.
हे काहीसं कमी होत असं वाटून इलेक्ट्रोनिक
माध्यमांनी लोकसभा संपताच विधानसभेच्या निकालासाठी सर्व्हे सुरु करून टाकले आणि
आपला 'टीआरपी' बाजार
मांडून टाकला. चार मतदार संघांचा सर्व्हे करून पंधरा मतदार
संघांचे निकाल जाहीर करून मोकळे झाले.
वास्तवतः पहिले तर नॅशनल स्टॅटिकल ऑर्गनायझेशनला देखील आश्चर्य वाटावे इतक्या जलद
गतीने सर्व्हे पूर्ण झाले. कुठल्या वाहिन्यांनी कुणाला विजयी केले आणि विजयी पताका हातात देवून
मोकळे झाले
हे तर आपण सगळ्यांनी पहिले. आता प्रश्न उरतो तो असा कि एवढे सगळे होवून गेले तर
मग आघाडी से बिघाडी, महायुती से महातुटी चे प्रश्न का उभे राहतायत? जर विजय निश्चित मानायचा तर भांडण कशासाठी? उद्या विजयाचे श्रेय कुणाला यासाठी? कि सत्ता कुणाच्या हातात एकवटणार यासाठी? मुळात आम्हाला सत्ता नकोय आम्ही फक्त जनतेच्या
भल्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी विजयी होऊ अशा एकीकडे दिवन्ड्या पिटायच्या आणि
इथे घरात तुझी आमदार जास्त का माझी आमदार मंडळी जास्त यावर खलबती करायच्या. मग उगीच जनतेच्या कळवल्याचा खोटा भाव कशाला आणायचा?
पण मित्रांनो राजकारणातील गणितं जरा वेगळी असतात. जागावाटपाचा तिढा दिसतो तेवढा अवघड नाही, सोपाच आहे फक्त चालू आहे तो महाराष्ट्राला 'उल्लू बनाविंग' प्रोग्राम.
हा गेला पंधरवडा म्हणजे नेमकं काय तर "पितृपक्ष". या कालावधी मध्ये आपले
पूर्वज जे वर्षभर उपाशी असतात ते कुठून कुणास ठाऊक येतात आणि अगदी 'गुगल मॅप्स' वर
पत्ता शोधावा तसे नेमके घर शोधून आपल्या
घरावर येऊन बसतात. मग आपण त्यांना ठराविक पद्धतीने ठरलेला भोजन
ग्रहणाचा आनंद द्यायचा, तृप्त करायचे आणि निरोप घ्यायचा. ही आपली परंपरा. पण तुम्ही म्हणाल कि याचा इथे काय
संबंध? तर या सर्व प्रकाराव्यातिरिक्त पितृपक्षाच्या
कालावधीत कुठलेही शुभकार्य करू नये,
नवीन जमीनजुमला,
व्यवहार मार्गी लावू नये, नवी 'इन्व्हेस्टमेंट' करू नये असे नियम असतात म्हणे. मग मला सांगा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि
भविष्यासाठी आखली जाणारे 'भागीदारी'चे व्यवहार या काळात करून कसे चालेल. अशुभ नाही का
ठरायचे ते?
अहो सत्ता मिळवायची आहे? सुरुवातीलाच असे अशुभ वातावरणात डाव मांडले तर पुढे
पाच वर्षे कसे चालायचे? म्हणून हा तिढा काहीसा वाढला. पण तो काही पक्षांच्या हितासाठी नाही. हे सार घडलं
केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी. अशुभ पायावर 'आधुनिक' महाराष्ट्राचा
विकास अशुभ ठरला तर?
चालेल का तुम्हाला? नाही ना. म्हणून तुमच्या आमच्या काळजीपोटी झालेला
हा जागावाटपाचा तिढा आहे आणि आश्चर्य
म्हणजे २००९ च्या विधानसभा निवडणुका पितृपक्षातच आल्या होत्या तेव्हा देखील
उमेदवारी अर्ज हा कालावधी संपल्या नंतरच भरले गेले होते. शेवटी देशातील अग्रेसर
आणि आधुनिक राज्य आहे आपलं!
यात आणखी एक महत्वाचे म्हणजे 'उल्लू बनाविंग प्रोग्राम पार्ट टू'. दारुड्या लोकांना दारू पिल्यावर जोम अंगात चढतो. जोम वाढला कि मग बायकोला दणादण मारहाण सुरु होते.
हा कलकलाट वाढला कि शेजारी पाजारी गोळा होतात त्याबद्दल हळहळ व्यक्त करतात, शेवटी भांडण थांबवायला शेजारी सरसावतात. पण हे पाहून दारुडा अधिकच जोमात येतो आणि आपला खेळ चालू ठेवतो, हा प्रकार काहीसा पब्लिसिटी
स्टंटचा आहे. बघा ना तुम्हीच. आता लोकसभा संपल्यापासून यांनी राज्यात आणि केंद्रात
केवळ युती असणार हे जाहीर करून टाकले. मग मतदानाला २०-२५ दिवस शिल्लक राहायची वेळ
आली तरी यांचे जागा वाटप निश्चित होईना? इतकं टोकाला जाईल का हो हे? महिनाभर जागा
वाटपाचा तिढा अशा बातम्या सोडून दिल्या आणि मग काय अखंड महाराष्ट्रात चर्चेची
गुर्हाळ सुरु झाली. लोकांना हळहळ वाटू लागली. अरेरे युती तुटायला नको बाबा अशी
प्रत्येकजण कॉमेंट करत होता. महायुती तुटली म्हणजे मग आयुष्यचं संपलं अशा
अविर्भावात दुखी होऊ लागले. झालं जे हवं होतं ते मिळालं अवघा महाराष्ट्र महायुतीमय
आधीच करून टाकला. आता अपेक्षित मतदानाची आणि निकालाची फक्त वाट पहायची.
या चारही पक्षातील एकही पक्ष स्वबळावर लढायची
धमक दाखवू शकत नाही. फक्त बाता मारायला पुढे आहेत. शेवटी यांना एकमेकांशिवाय आधार
नाहीच. हातात येणारी सत्ता महायुतीला सोडू वाटेल का हो? अहो ज्याची गेली १५ वर्षे
वाट पहिली तो घास हातातोंडाजवळ आला असताना कुणी धुडकावेल का? इकडे आघाडीला आपलाच
१५ वर्षांचा प्रताप माहित आहे पण युतीचे तीन तेरा वाजावे आणि आपला ‘चान्स’ वाढावा
एवढीच माफक अपेक्षा. पण आता केवळ प्रश्न उभा राहतो तो हा कि या सगळ्यामागे काय तर
पितृपक्ष आणि मुहूर्त? आता महायुतीची विचारसरणी पाहता हे उघड आहे कि आता हे पंचांग
पाहणार, मुहूर्त पाहणार आणि मग आपला विकास करणार. आपण अपेक्षा ठेवायची कि
अंधश्रद्धेला आयुष्यभर विरोध करणाऱ्या डॉ. दाभोलकरांना हे दोन्ही सरकारे न्याय
देणार. शेंबडं पोरगं देखील याचं उत्तर देईल. पण आम्हा सुजाण जनतेला याची अक्कल
केव्हा येणार हे कुणास ठाऊक. एकीकडे फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घेवून राजकारण
करायचे आणि अशा अनिष्ट रूढी परंपरांना धरून बसायचं. हे असे ढोंगी पक्ष आहेत सारे.
इथे प्रत्येकाला आपली खुर्ची आणि सत्ता प्यारी आहे. जनतेची कळकळ हे केवळ थोतांड
आहे. आता फक्त वाट पहायची कि हा सारा गोंधळ उघडपणे पाहून शहाणा मतदार या ढोंगी
पक्षांना उल्लू बनवतो कि या पक्षांकडून जनतेला नेहमी प्रमाणे उल्लू बनाविंग चालू
राहते.
No comments:
Post a Comment