Wednesday, August 27, 2014

जन्म सिनेमाचा .... (उत्तरार्ध)


नमस्कार मित्रांनो मागच्या लेखात आपण पाहिलं कि सिनेमा नावच एक नवीन विश्व कसं जन्मास आलं आणि भारतात सिनेमा कसा आला. त्यापुढील इतिहास आपण या लेखात पाहणार आहोत.
सन १९०३ मध्ये एडविन एस पोर्टर नावाच्या एका माणसाला एक गोष्ट आपण हलत्या चित्रांच्या मार्फत सांगू शकतो असे वाटू लागले. त्याने गोष्ट लिहून काढली आणि त्याचा सिनेमा बनवला.तो सिनेमा म्हणजे  ' ग्रेट ट्रेन रॉबरी' होय. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली ती थॉमस एडिसन कंपनीने. कथा सांगणारा हा जगातील पहिला सिनेमा असल्याने त्याचे एतिहासिक महत्व आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटात दरोडेखोर टोळी प्रथम एका अधिकाऱ्यावर हल्ला करते आणि आगगाडीत घुसते. गोळीबार होतो आणि आगगाडीत थांबते. दरोडेखोर लुटालूट करतात आणि अखेर सैन्याची तुकडी पाठलाग करून त्यांना ठार करते. अशा आशयाचा हा सिनेमा. यावेळी प्रथमच कमेरा हळू लागला. कधी आगगाडीत तर कधी रुळावर. याच सिनेमात पहिल्यांदा डमी वापरण्यात आली. वेगवेगळ्या चित्रपटातील दृश्यांचे संकलन (एडिटिंग) तंत्र वापरले गेले. अभिजात चित्रपट म्हणून या चित्रपटाचा उल्लेख होतो.
सिनेमाचा जन्म जरी युरोपात झाला तरी तरी त्याला खरी प्रसिद्धी प्राप्त झाली ती अमेरिकेत. तिथे याचा प्रतिसाद पाहून छोटी छोटी सिनेमा हॉल सुरु झाले. फिल्मच्या पट्ट्या जाऊन आता रिळे वापरली जाऊ लागली. अडोल्फ झुकोर या तरुणाने फ्रांस मध्ये 'क्वीन एलिझाबेथ' (1912) हा चार रिळांचा चित्रपट बनवला, तर एरीन्को गुओझोनी या इटालियन माणसाने १९१३ मध्ये दोन तासांचा 'क्वो वादीस' हा सिनेमा बनवला आणि पूर्ण लांबीची सिनेमा निर्मिती सुरु झाली.
युरोपातील हा पूर्ण लांबीच्या सिनेमाचा उदय पाहून अमेरिकेत डेव्हिड वार्क ग्रीफित याने आपल्या जवळील असेल नसेल तो पैसा ओतून १९१५ मध्ये पूर्ण लांबीचा ' बर्थ ऑफ नेशन' सिनेमा बनवला. त्यातील युध्द दृश्ये, जनसमुहाची दृश्ये,ऐतिहासिक घटनांचा आढावा हा नवीन अनुभव प्रेक्षकांना मिळाला. सिनेमा केवळ मनोरंजन नसून तो एक कलाप्रकार आहे हे या चित्रपटाने जगासमोर मांडले. हा सिनेमाच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरला. मूकपट वाढू लागले, पैशाचा ओघ वाढू लागला. छोट्या सिनेमा हॉल ची मोठी सिनेमागृहे होऊ लागली. सिनेमाचे आकर्षण वाढवण्यासाठी वाद्यवृंदाची जोड सिनेमागृहात दिली जाऊ लागली.
शनिवार मे १९१३ दादासाहेब फाळके यांनी मुम्बई मध्ये 'राजा हरिश्चंद्र' मूकपट प्रदर्शित केला. भारतात तयार झालेला हा पहिला सिनेमा. दादासाहेब भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ठरले. अमेरिकेत ग्रिफिथ नावाचा सिनेमाचा जादुगार जन्माला आला आता वेळ होती ती सोव्हिएत युनियनची. आजच्या रशिया अन तेव्हाच्या सोव्हिएत मधील सर्गेई मिखाइलोविच आईझ्हेन्स्तीनने १९२५ मध्ये 'बेटलशिप पोटेम्कीन' या चित्रपटात नवनवी तंत्रे वापरून नव्या युगाची सुरवात करून दिली. त्याने एकाच प्रसंगाचे वेगवेगळे शॉट घेऊन ते संकलित करून विशिष्ट प्रभाव पडणारी परिणामकारक अशी 'मोन्टाज' पद्धती जन्माला घातली. त्यांचे हे योगदान आजही चित्रपट विश्वासाठी अत्यंत महत्वाचे आहे. रशियाच्याच पुडोवाकीन आणि डोब्झेन्को सारख्या चित्रपट दिग्दर्शकांनी आशयगहन अभिव्यक्तीसंपन्न चित्रपट निर्मिती केली त्यामुळे पुढे युरोपात रशियन चित्रपटांची प्रसिद्धी होऊ लागली. युरोपियन चित्रपट आणि रशियन निमंत्रित चित्रपट यासाठी चित्रपटगृहे कमी पडू लागली. त्यासाठी अनेक नवीन फिल्म सोसायट्या स्थापन झाल्या.
१९२० च्या दशकापर्यंत सिनेमाने जगाला वेड लावून सोडले. यातील अमाप पैसा देखील सगळ्यांना दिसू लागला. स्टुडीओ सिस्टीम तयार होऊ लागल्या न्यूयोर्क मधील चित्रपट सृष्टी हॉलीवूड या अमेरिकेच्या पश्चिम किनारावर स्थलांतरित झाली. मोठमोठे स्टुडीओ याच काळात सुरु झाले. युनिव्हर्सल पिक्चर्स, वॉर्नर ब्रदर्स, पेरामाउन्ट, फोक्स असे मोठे स्टुडीओ निर्माण झाले अन सिनेमाचे जग विस्तारू लागले. ते अधिकच भव्य होऊ लागले.
मूकपट युग हे श्रेष्ठ विनोदीपट युग म्हणून संबोधले जाते. चार्ली चापलीन, बस्टर कीटन, हेरॉल्ड लोईड या कलावंतानी सिनेमा अधिक कलासमृद्ध केला. आजही हे चित्रपट पाहताना ध्वनीचा अभाव जाणवत देखील नाही हाच या महान कलाकारांचा गौरव आहे. १९२५-२६ दरम्यान चित्रपटाला आवाज देण्याचा प्रयत्न होऊ लागला. एलन क्रोस्लंड याने दिग्दर्शित केलेला आणि वॉर्नर ब्रदर्सने १९२७ मध्ये प्रदर्शित केलेला ' जाझ सिंगर'हा चित्रपट जगातील पहिला बोलपट ठरला आणि चित्रपटांचे एक नवे युग सुरु झाले. या सोबतच मूकपट काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आणि हळू हळू लोप पावले. आजच्या भव्य सिनेमांचा भव्य हिमालय उभा आहे तो या इतिहासाच्या पायावरच.
मित्रांनो अशा पद्धतीने सिनेमा जन्माला आला आणि आज इथवर येउन पोहचला.