Wednesday, November 5, 2014

जातीवादाने बरबटलेला महाराष्ट्रीय जिहाद...

जिहाद म्हटला कि आपल्या डोळ्यापुढे येतो तो केवळ मध्य आशिया आणि त्यातील धार्मिक तेढ. पण जिहाद हा धर्म घटक नसून ती वृत्ती-प्रवृत्ती आहे हा विचारच आपल्याला शिवत नाही. आता तुम्ही म्हणाल कि असली जरी ही प्रवृत्ती तर त्याचा महाराष्ट्रात काय संबंध? इथे कुठे होतोय जिहाद? निश्चित इथे जिहाद होतोय. इथला जिहाद मुस्लीम समाज करत नाहीये, तर इथे जिहाद करतोय तो हिंदू समाज. नक्कीच मी बोलतोय ते केवळ धाडस नाही तर उघड सत्य आहे. खैरलांजी असो वा खर्डा किंवा आताच जवखेडा असो. इथे होणारे हत्याकांड नाहीत तर अमानुषपणे चाललेला हिंदू जिहादच आहे. जिहाद पुकारला जातो तो परधर्मीयांविरोधात, पण इथे मात्र हिंदू-हिंदू मध्येच या जिहादला तोंड फुटलं आहे. पुरोगामी आणि पुढारलेला महाराष्ट्र या गोंडस वाटणाऱ्या नावाखाली काहीकाळ छुपा आणि आता उघडपणे मांडलेला जातीवाद मूळ धरू लागला आहे.
जातीवाद संपला, आता कुठे शिल्लक राहिलाय जातीपातीचा प्रश्न असे आपण म्हणतो पण खरच तथ्य आहे का त्यात. जर असेल तथ्य तर का घडतायत या घटना. याचा विचार कोण करणार आहे? आपल्याला कुठे फरक पडतोय? याची झळ आपल्याला कुठे बसतेय? असेच जर प्रश्न पडत असतील तर आणखी एक प्रश्न स्वतःलाच विचारावा, मी याच समाजाचा भाग आहे कि आणखी कोणत्या? उत्तर तुमच तुम्हालाच सापडेल. मुळात या सगळ्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे इथल्या समाजाच्या घटकांमध्ये खोचून खोचून भरलेली बुरसट आणि मागास वृत्ती. माणसाला माणसाच्या नजरेने न पाहता, त्याच्याकडे जनावराच्या नजरेने पाहणं किंवा त्यहिपेक्षा नीच नजरेने पाहणं ही कोणती प्रवृत्ती? ही प्रवृत्ती आकाराला येऊन आता अनेक युगे उलटली पण तीच कुजलेली मानसिकता घेऊन आज एकविसाव्या शतकात थोबाड वर करून आपला समाज वावरतो आहे.
आर्य असणाऱ्या ब्राम्हणांनी जे ३००० वर्षांपासून पेरून ठेवलं तेच डोक्यावर घेऊन नाचणारा सवर्ण आजही दिसतोय यातच सगळं आलं. जातीपातीची फुशारकी मिरवर्यांना आपल्याच इतिहासाची माहिती नसली तरी आपण ब्राम्हणांपेक्षा कमी का असेना पण किमान दलितांच्या वरचढ आहोत यात जणू स्वर्गसुख वाटतं. हे फुटकळ स्वर्गसुख मिरवत आयुष्य घालावण्यातच धन्यता वाटावी यासारखे दुसरे हास्यास्पद काय असेल. आपला वास्तविक आगापिच्छा माहित असो ना असो मी सवर्ण आहे हे महत्वाचे ही भिकार मानसिकता अंगी बाळगण्यात कसलं आलंय शहाणपण? पण का हे विसरताहेत कि ज्यांच्यावर आपण हा अमानुष अन्याय करतो आहोत ते माझ्याच समाजाचे घटक आहेत किंबहुना माझ्याच रक्ताचा भाग आहेत आणि ज्यांची अक्कल आपण गेली अनेक वर्षे भाड्याने घेतली आहे ते रक्त मुळात परकं आहे. मात्र हे कसं मान्य होणार. ब्राम्हण म्हणजे देव यांना! देवाला दुखवून कसे चालेल बरे? ब्राम्हण कोप झालाच तर कुठे जावं? कोण वाली उरेल आम्हांस? ही यांची विचारसरणी. ज्याच्या नावावर हा जगाचा फुल शो चालवला जातो तो परमपिता ब्रम्हा जरी आला आणि त्याने विनवण्या जरी करून सांगितल्या तरी यांना ब्राम्हणांनी सांगितलेलं ज्ञानच पवित्र वाटेल. या असल्या सवयीमुळेच ब्राम्हणांनी आपल्या पोळ्या यांच्याच पाठीवर भाजल्या. आपली पाठ सोलपाटून निघाली याच काही नाही पण ब्राम्हणाच पोट भरलं यात सुख मानणारे हे सवर्ण.
नगर जिल्ह्यातच खर्डा येथे नितीन आगे नावाच्या कोवळ्या मुलाचा गुन्हा काय होता कि त्याला मरेपर्यंत मारले? तथाकथित उच्च वर्णीय मुलीसोबत प्रेम केलं हेच? एकाबाजूला असले भिकार विचार मनात ठेवायचे आणि दुसऱ्याबाजूला याच बड्या धेंडांना आपल्याच शेतात, ऊसात दलित स्त्रिया, मुली भोगायला चालतात. पोटाला रोजगार देतो म्हणून त्यांच्या गरिबीचा फायदा उठवतांना हा जातीपातीचा बाणा कुठं जातो? हे धंदे करतांना का आठवत नाही ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा ताठर बाणा? आपल्या पोरीबाळींना तेवढी अब्रू असते आणि दलितांच्या अब्रू काय अशा उघड्यावर पडल्या आहेत का? पर जातीत प्रेम करणे जर यांच्या दृष्टिकोनातून गुन्हाच असेल तर मग ज्या सवर्ण मुलीसोबत त्याचे प्रेम होते तिला का जिवंत ठेवलीय? तिला नाही का शिक्षा देवू वाटत या न्यायवाद्यांना? का ती सवर्ण म्हणून पवित्र? त्या कोवळ्या जीवाला फासावर लटकवायला यांना लाज वाटू नये? सोनाई प्रकरणात कडबा कापायच्या कोयत्याने तुकडे करतांना कुठला पुरुषार्थ दाखवला गेला? खैरलांजी प्रकरणात शिक्षा सुनावल्यावर सुद्धा यांच्या चेहऱ्यावर आपल्याकडून गुन्हा घडल्याचा साधा भाव नसतो. आपण जणू लाज वाटण्यासारखे काही केलेच नसल्याचा आव आणणारे महाभाग हे. मानावतेसाठीची दया यांच्या अंगी नाही. जवखेडा मध्ये दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार कुठल्या मानसिकतेने झाला? खून होणे ही जरी एक नेहमीची बाब असली तरी कटर ने देहाचे तुकडे करणे या अमानुष आणि बिभित्स वृत्तीला काय म्हणायचे? माणूस म्हणून जगण्यापेक्षा मग सरळ आम्ही सैतान आहोत हे जाहीर करा आणि मग असे वागा?
मुळात या सवर्णांचा अहं भाव दुखवायला लागल्यापासूनच या सगळ्या घटनांना सुरुवात व्हायला लागली आहे. काल परवापर्यंत दोन घास खायला न मिळणाऱ्या जातीचे आज प्रगती करतायत, आपल्या रांगेत कुठेतरी उभे राहतायत, आपल्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत हे डोळ्याला खुपायला लागलं आहे. गेली ३००० वर्षे तुम्ही आमच्या डोक्यावर पाय ठेवून नाचला तेव्हा हा विचार कुठे गेला होता? आता जरा कुठे दलितांचे पंख फडफडले तर लगेच त्रास व्हायला लागला? आता तर कुठे सुरुवात आहे तोवर ह्या घटना घडत आहेत जेंव्हा अगदी सगळ्यांच्या बरोबरीने हा दलित समाज प्रगती करेल तेव्हा काय उघड पणे चौकाचौकात तुम्ही मुडदे पाडत फिरालं. या सगळ्यात कपाळावर सद रक्षणाय खल निग्रहणाय असं मिरवत फिरणाऱ्या खाकीला तर सलाम! यांनी नेमकी कुणाच्या सरंक्षणाची शपथ घेतलीय ते कळतचं नाही. दलितांवर होणारे अन्याय यांच्या गावीच नसतात. एखादा दलित चोर यांना लगेच सापडतो मात्र दलितांवर अन्याय करणारे यांना आयुष्यभर सापडत नसतात. खैरलांजी प्रकरणात दबाव अनावर झाला म्हणून शेवटी न्याय देन भाग पडलं. मग बाकीच्या प्रकरणात का घडत नाही हे.
दलित चळवळी जरा कुठे डोक्यावर जाऊ लागल्या कि आता काय नवीन फंडा शोधून काढलाय, दलितांच्या चळवळीत नक्षलवाद्यांनी हात घातला आहे असं म्हटलं कि झालं. उठसुठ असे आरोप केले कि एक दिवस सगळ्यांना पटणार हे. परंतु आज घडणारे अन्यायी भ्याड हल्ले असेच होत राहीले आणि त्याविरोधात आवाज उठवणार्या दलित तरुणांना जर असेच नक्षलवादी संबोधले जाऊ लागले मग वैफल्यातून या समाजाने भविष्यात नक्षलवाद जवळ केला,  तर त्याला जबाबदार कोण असेल? हातात तंबाखू चोळत हे सारं पाहणारी आणि सामाजिक समानतेची 'थाप' मारणारी शासन व्यवस्था? या सगळ्यांच्या वर माध्यमे आपली जबाबदारी पार पाडतात. माध्यमांना पंतप्रधानांनी आज या रंगाचा सदरा घातला, त्या रंगाचे जाकेट घातले हे तासातासाला दाखवण्यात अधिक रस असतो, पण महाराष्ट्रात यांच्याच नाकाखाली उघडपणे ही अमानुष हत्याकांडे घडतात त्याच सोयरसुतक नसतं. एखादी बातमी दिली की संपल. तो मुद्दा लावून धरण्यात यांना घेनदेन नसतं. या सगळ्यात लढलं पाहिजे ते केवळ दलित चळवळींनी हा जणू प्रघातच पडला आहे. इथे सामान्य समाजाला याचे काही उरले नाहीये. मरणारा माझा कुणी नाही ना? मग मी कशाला उभा राहू ही मानसिकता. या हत्यांकडे केवळ दलित हत्या म्हणून न बघता, आपल्याच समाजातील घटकाची अमानुष आणि क्रूर हत्या म्हणून पाहिली तर जाणिवा जिवंत आहेत समाजाच्या असं म्हणता येईल.
पण एक मात्र खरे इथून पुढे महाराष्ट्राने पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्र असले झेंडे घेऊन वाटचाल करू नये आणि असली विशेषणे सुद्धा लावून मिरवू नये. उठसुठ असा खुलेआम एक समाज दुसऱ्या समाजाचे गळे चिरत असेल आणि त्याला कारण केवळ आणि केवळ जातपात असेल त्याला काय अर्थ उरतो. आपल्याच मातीतल्या मानव नावाच्या श्वापदांचे हे अमानुष आणि किळसवाणे उद्योग पाहून ना त्या शिवरायांना बरं वाटत असेल ना आंबेडकरांना आपण समानता मिळवून दिली याचं समाधान मिळत असेल. पण इथल्या कर्म आणि बुद्धीने दरिद्री समाजाला कोण समजावणार? इथे जातीची मिजास प्यारी. मानातल्या मनात अजूनही इथे अस्पृश्यता जपलेलीलीच आहे हे आता उघड आहे. शासनाने सुद्धा आता हा समानतेचा झेंडा खाली उतरवावा मग हे सारे हल्ले बांगड्या भरून सगळ्या समाजाने डोळे भरून पाहत बसावे. तो शोभेल माझा निधड्या छातीचा आधुनिक महाराष्ट्र. जय पुरोगामी महाराष्ट्र!