सगळं काही ठीक सुरु असतांना त्यादिवशी अचानक अभिजित देवकुळेचा फोन आला. खरतरं
अभिजित म्हणजे माझा मास कम्युनिकेशनचा बॅचमेट. मास कॉम होऊन आता जवळ जवळ ४ वर्षे
उलटली होती. फोन उचलला आणि अभिजित सरळ म्हणाला ‘’श्रीपाद अॅडमीट आहे मुंबईत, ब्लड
कॅन्सर झालाय.’’ कानावर विश्वास बसला नाही. खर्चासाठी थोडी मदत करायची म्हणून
सगळ्यांचे प्रयत्न सुरु झाले. तिकडे मुंबईत अभिजित सोबत अभि झांबरे, दिपक नारनवर आणि
उत्तम पोवार मुख्यमंत्री निधीतून काही आर्थिक मदत मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत
होते. शुक्रवारी मीटिंगमध्ये असतांना अचानक श्रीपादचा फोन आला. मनात असूनही फोन
उचलू शकलो नाही, सलग चारवेळा त्याने फोन केला पण बोलता आलं नाही. शनिवारी
कॉलेजमध्ये असतांना त्याला फोन करायचा म्हणून नंबर डायल केला, रिंग होते तोवर एक
गृहस्थ मला भेटायला आले आणि मला फोन कट करावा लागला. पाडवा तोंडावर असल्याने
संध्याकाळी कॉलेज संपवून बाईकवरून मिरजेला यायला निघालो. येताना मध्ये थांबल्यावर
श्रीपादला फोन करायचा ठरवला. तोवर अनिल देशमुख सरांचा फोन आला, ‘‘श्रीपाद बद्दल
कळाल का?’’ मी म्हटलं “हो तो मुंबई अॅडमीट आहे” पलीकडून उत्तर आलं “श्रीपाद गेला”.
ऐकून पायाखालची जमीनच सरकली. पुढे काय बोलाव तेच समजत नव्हतं. श्रीपाद या जगात
नसणे हि कल्पनाच करणे अशक्य होतं. थोडावेळ गेल्यावर भानावर आलो, वास्तवाची जाण
झाली. मी पुन्हा मार्गक्रमित झालो. बाईक सुरु झाल्यावर श्रीपादच्या एक-एक आठवणी नजरेसमोरून
धावू लागल्या.
आमचा विद्यापीठातला मास कॉमचा पहिला दिवस... वर्गात येऊन बसलो. सारेच
एकमेकांना अनोळखी. म्हणून मी मागे जाऊन बसलो. माझ्या शेजारीच गोरा गोमटा, मिसरूड
फुटलेला, अत्यंत निश्चल आणि शांत चेहरा माझाकडे पाहत होता. दोघांनी एकमेकांना
किंचित स्मितहास्य दिलं. मी जयेंद्र राणे, सांगली म्हणत माझी ओळख सांगितली आणि तो
म्हणाला फक्त मी श्रीपाद कदम, दहीगाव, सातारा म्हणून गप्प बसला. श्रीपादची आणि
माझी ही पहिली भेट. त्यानंतर श्रीपाद, मी सोबतच वर्गात बसू लागलो, त्याच्यासोबत
मैत्री होणं ही अत्यंत स्वाभाविक आणि सहज गोष्ट होती. त्याचा स्वभाव निराळाच होता.
का? कुणास ठाऊक? पण त्याच्यासोबत माझा एक कम्फर्ट झोन तयार होऊ लागला. मी १ नंबर
हॉस्टेल जॉईन केलं, श्रीपाद २ नंबर हॉस्टेलला होता ते पण टी. व्ही. रूमला. मी
आल्याच त्याला कळवलं, लगेच श्रीपाद दारात हजर झाला. त्याने स्वतःहून रूमची
आवाराआवर सुरु केली, सामान नीट ठेवल्यावर बराचवेळ गप्पा मारत बसलो. नंतर श्रीपाद
त्याच्या रूमवर झोपायला निघून गेला, तो कदाचित शेवटचाच. कारण त्यानंतर श्रीपादचं
सामान केवळ त्याच्या रूम मध्ये होतं आणि श्रीपाद माझ्याच रूमवर. अगदी झोपायलाही
त्याला तिकडे जाऊ वाटत नव्हत. अल्पावधीत आमच्यातलं नातं घट्ट होत गेलं. हळू हळू
श्रीपाद मला कळत गेला. तो इतरांपेक्षा निराळा होता. वर्गात अत्यंत अबोल आणि शांत
श्रीपाद, माझाजवळ निराळाच असायचा. माझासोबत असतांना त्याच बालपण जागं व्हायचं,
स्वच्छंदी जगायचा तेव्हा. तो माझ्याजवळ आणि मी त्याच्या जवळ भरभरून बोलायचो.
असंच एकदा मोकळेपणात त्याने आपली कहाणी मला सांगितली आणि खरा श्रीपाद मला
तेव्हा समजला. श्रीपाद राहायचा ते गाव अत्यंत छोटं. एस. टी. बस देखील येणे मुश्कील
अशा इवल्याश्या गावातून श्रीपाद आला होता. श्रीपाद लहान असतांनाच आईचं छत्र हरपल
होतं. आईच्या प्रेमाला मुकलेल्या जीवाला सांभाळायची जबाबदारी त्याच्या वडिलांची
होती, पण उपेक्षा श्रीपादचा पिच्छा सोडणार नव्हती. आईच्या जाण्यानंतर वडिलांनी
अचानकच घर सोडलं. ते कुठे निघून गेले ते आजवर कधी कळालं नाही. नियतीने त्याच्यावर
जीवघेणा वार घातला होता. पण त्या इवल्या जीवाला तळहाताच्या फोडासारखं जपण्यासाठी
दोन हात पुढे आले. श्रीपादचे मामा-मामी. श्रीपाद त्यांना ताई-दादाच म्हणायचा. त्यांनी
त्याची सारी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून
त्यांनी श्रीपादला लहानाचा मोठा केला. दादांनी शेती करत पोटच्या पोराला कुणी जपणार
नाही, इतक्या लाडाने त्याला वाढवला, शिकवला. त्याला आई-वडिलांची उणीव भासू नये
म्हणून आटोकाट प्रयत्न केले. प्रसंगी तोंडचा घास ताईंनी श्रीपादला भरवला. या
साऱ्याची जाण श्रीपादला खूप होती. अभ्यासात श्रीपाद हुशारही होता. मास कॉम आधी
त्याने फिशरीजमध्ये बी. एस. सी. चे शिक्षण चांगल्या मार्कांनी पूर्ण केलं होतं.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, नशिबाने आई-वडिलांना हिरावून केलेली त्याची उपेक्षा
आणि वृध्द ताई-दादांची समर्थ साथ पाठीशी बांधत श्रीपाद भविष्याची स्वप्न घेऊन विद्यापीठात
आला होता. या साऱ्या परिस्थितीने त्याला एक अनाकलनीय समज बहाल केली होती. त्याच्या
इतके सहनशील आणि समजूतदार वागणे मी कुठेच पहिले नव्हते. त्या आमच्या साऱ्या
गप्पानंतर श्रीपाद बद्दल मला भरूनही आलं आणि अभिमानही वाटू लागला. त्यादिवसानंतरचा
श्रीपाद माझासाठी काही औरच होता. त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटू लागलं. आमचे
मैत्रीचे बंध आणखी घट्ट झाले. मी कुठल्या सणासाठी घरी आलो की मम्मी खास
त्याच्यासाठी पुरणपोळ्या माझाकडून पाठवू लागली. त्या खातांना ताईंच्या आठवणीने
श्रीपादचे पाणावलेले डोळे मी अनेकदा पुसलेत. त्याने फक्त मलाच हा लळा लावला असं
नाही तर माझा रूम पार्टनर प्रशांतचा देखील तो अत्यंत जवळचा मित्र बनला. श्रीपादने
तर त्याला न्यायमूर्ती लोखंडे असे विशेषण बहाल केले होते. आमच्या रूमवर तिघांच्या
रोज रात्री अनेक विषयांवर गप्पा रंगायच्या. कधी कधी तर मी, श्रीपाद आणि दैनिक
पुढारीचे अनिल देशमुख सर राजेंद्रनगरच्या रिंगरोडच्या फुटपाथवर रात्री दोन-दोन
वाजेपर्यंत राजकारणापासून ते अगदी समाजकारणापर्यंत गप्पा मारत बसायचो. ऑफिस
सुटल्यावर रात्री बारा नंतर कुठूनही भेळ पार्सल घेऊन देशमुख सर येणार हे नित्याचे
गणित होते. एकमेकांच्या सहवासाने आम्हाला विलक्षण वेड लावले होते. कदाचित यामुळॆच
इतरांपुढे गप्प-गप्प राहणारा श्रीपाद माझासोबत अधिकच खुलायचा. वर्गात आमची
जय-विरूची जोडी म्हणून चेष्टाही होऊ लागली. त्याच्या स्वभावाची गोडी विभागातल्या
डॉ. निशा पवार, अश्विनी कांबळे, अनिल देशमुख, नीरज नारकर, रत्नाकर पंडित यांच्या
मनात देखील घर करून गेली. अल्पावधीत त्याने विभागात आपली शांत, संयमी आणि
सुस्वभावी विद्यार्थी म्हणून ओळख निर्माण केली. रत्नाकर पंडित सरांच्या चपखल
बोलण्याचा तो निस्सीम चाहता होता.
वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा आर्थिक स्त्रोत मंदावला होता. खर्चाचा
डामाडोल बिघडला होता. तेव्हा विद्यापीठात चहा पिणं सुद्धा जमत नव्हतं. श्रीपादची
परिस्थिती देखील माझाहून निराळी नव्हती. तेव्हा कित्येकवेळी मी आणि श्रीपादने एक
हाफ चहा सुद्धा अर्धा-अर्धा करून एकाच ग्लास मध्ये पिला होता. रविवारी एकवेळचे
जेवण असल्याने एक ऑम्लेट दोघात खाल्ले होते. बाहेर जाऊन खाण्याची न त्याची ताकद
होती ना माझी. अशा छोट्या-छोट्या पण अत्यंत महत्वाच्या क्षणांनी आमचं नातं
मैत्रीच्या पलीकडे आम्ही घेऊन गेलो. बायोलॉजीचा विद्यार्थी असल्याने त्याला
फुलांची आणि निरनिराळ्या प्रजातीच्या कीटकांची आवड होती तर मला फोटोग्राफीची खूप
आवड होती. यामुळेच विद्यापीठातला एक अन एक कोपरा आणि प्रत्येक रस्ता त्याने आणि मी
सोबत पिंजून काढला होता. एकदा केआयटी कॉलेज मध्ये लघुपट स्पर्धा आयोजित केली होती.
त्यात आपला लघुपट असावा म्हणून त्याने हट्टच लावला होता. त्या कामी आम्हाला डॉ.
निशा पवार आणि नीरज नारकर यांनी मोलाची साथ दिली. आमच्या लघुपटाला तृतीय क्रमांक
मिळाला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. केआयटी मध्ये निकाल कळल्यावर त्याने मला
मारलेली घट्ट मिठी मला आजही जाणवते. आमच्या त्या लघुपटात केवळ एकच मानवी हात होता
आणि तो श्रीपादचा होता. तोच आमच्या लघुपटातला एकमेव अभिनेता होता. आपण काहीतरी करू
शकतो याच समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. श्रीपाद आणखीनच मनात घर
करू लागला होता.
साताऱ्याच्या भूमीतून आलेल्या श्रीपादला कास पठारावर डॉक्युमेंटरी करायची
होती. त्याने त्याचा चांगला अभ्यास सुरु केला होता. शुटिंगसाठी त्याच्या सोबत मी
आणि गुरु स्वामी दोघे त्याच्या गावी गेलो. रात्री मुक्काम करून सकाळी शुटींगला
निघण्याचा आमचा प्लान ठरला. त्याने संध्याकाळी आम्हाला त्याचा सगळा गाव फिरून
कौतुकाने दाखवला. समाजमंदिरात बसून आम्ही दुसऱ्या दिवसाचे नियोजन केले. रात्री
ताईंनी भाकरी आणि घेवड्याची उसळ प्रेमाने वाढली. ताई-दादा, श्रीपाद, मी आणि गुरु
रात्री निवांत गप्पा मारून झोपलो. सकाळी कशीबशी एका गाडीची जुळवाजुळव करून आम्ही
कास ला पोहोचलो. त्याचं कास पठारावर डॉक्युमेंटरी करण्याचं स्वप्न खूप जुनं होतं.
ते प्रत्यक्षात येणार होतं. पण पुन्हा एकदा त्याच्या पदरी उपेक्षा आली. पावसाच्या
अभावाने तेव्हा कासवरची फुलं वाळून गेली होती आणि श्रीपादचे स्वप्नही कोमेजून
गेले. हताश होऊन आम्ही गावी परत आलो. लगेच कोल्हापूरला निघालो. खरंतर त्यावेळी
आमच्या तिघांच्याही खिशात मिळून नव्वद रुपये उरले होते. आम्ही कसेबसे साताऱ्याला
पोहचलो, पण नव्वद रुपयात कोल्हापूर कसं गाठायचं समजेना. शेवटी एका ट्रक मध्ये बसून
आम्ही कोल्हापूरला पोहचलो. ड्रायव्हरने दीडशे रुपये मागितले पण त्याला परिस्थिती
सांगितली आणि हातात नव्वद रुपये ठेवले अन त्यानेही शांतपणे ते घेतले. सकाळी नाश्ता
करून बाहेर पडलो होतो आणि कोल्हापुरात पोहचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते,
हायवे वरून चालत विद्यापीठ गाठले, तिघांच्याही पोटात खड्डा पडला होता. अशावेळी
आमचा एकच तारणहार आम्हाला आठवत होता. देशमुख सरांना फोन केला आणि हकीकत सांगितली.
त्या रात्री पुन्हा त्याच फुटपाथवर आम्हा चौघांचा दोन वाजेपर्यंत भेळेचा डाव
रंगला. डॉक्युमेंटरीचा झालेला फज्जा आम्ही हसत तिथे हवेत उडवला.
खरंतर लहानपणापासून प्रेमाच्या भुकेल्या श्रीपादला तरुण वयातल्या प्रेमाचा मोह
होणं साहजिक होतं. श्रीपादने एकांतात मला तिच्याबद्दल सांगितलं. तिच्याबद्दल
बोलतांना त्याच्या चेहऱ्यावरची लाली बघून मी खूप हसलो होतो. त्याने खूप मनापासून
तिला जीव लावला होता. ताई-दादांनीही पाठिंबा दिला. नियतीने उपेक्षा श्रीपादच्या
पाचवीलाच पुजलेली होती की काय कुणास ठाऊक? इथेही त्याला उपेक्षेशिवाय काहीच पदरी
पडले नाही. तिच्या लग्नाची तारीख ठरल्याच त्यानं मला सांगितलं. श्रीपादला
पहिल्यांदाच मी इतका हतबल आणि खचलेला पहिला. आयुष्य खूप मोठं आहे, अजून खूप जगायचंय
म्हणत त्याला सावरायला म्हणून मिठीत घेतलं तर मध्येच उठून त्याने त्याचा नेहमीचा
आनंद चित्रपटातला डायलॉग मारला – “बाबूमोशाय... जिंदगी लंबी नही, बडी होनी
चाहिये...” असं म्हणत हसत चालू लागला. क्षणात हळवा अन क्षणात कणखर हा श्रीपादचा
नवा अवतार मी तेव्हा अनुभवला. त्याच्या या डायलॉगची मला सवय झाली होती. पण नियती
श्रीपादची अशी चेष्टा करेल असं वाटलं नव्हतं. आनंद मधला राजेश खन्ना आणि श्रीपाद
यात इतकं साम्य केवळ कल्पनातीत. तो ही कन्सरनेच अवेळी गेला आणि श्रीपाद देखील.
तोही आपल्या आयुष्यात सगळ्यांना आनंद वाटत गेला आणि श्रीपादही. तोही परिस्थितीच्या
दुःखाचं रडगाणे गायला नाही आणि श्रीपादही. चित्रपटातला आनंद माझ्या आयुष्यात
बाबूमोशाय श्रीपादच्या रूपानेच आला होता. त्याने विद्यापीठातल्या दोन वर्षांच्या
सहवासात जगण्याची रीत मला शिकवली होती. मी त्याचा आयुष्यभराचा ऋणी झालो. शिक्षणानंतरही
आमचा हा ऋणानुबंध असाच पुढे सुरु राहिला. प्रत्येक आठवड्यात त्याचा एक फोन नक्की
असायचा. फोन आला की किमान एक तासतरी नक्की बोलणं व्हायचं. व्यावसायिक आयुष्यातल्या
खडतर चार वर्षा नंतर श्रीपाद साताऱ्याला पुढारी मध्ये रुजू झाला. आता हळू हळू
श्रीपाद स्थिर होऊ लागला होता. घर बांधून लवकरच लग्नाच्या बेड्यात अडकतोय म्हणून
त्याने मला कळवलं होतं. माझा उर तेव्हा भरून आला होता. आयुष्यभर नियतीशी झगडत,
संघर्ष करत श्रीपाद आता डौलाने उभा राहणार होता, ताई-दादांच्या म्हातारपणाची भक्कम
काठी बनत होता. पण अचानक आलेल्या कावीळ आणि कॅन्सरच्या वादळाने माझ्या बाबूमोशायचा
श्वास थांबला. क्षणार्धात सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. ताई-दादांचा श्वास
हरपला.
श्रीपाद तुझ्या मैत्रीने
मला जगणं शिकवलस आणि तूच असा अर्ध्यावर डाव सोडून गेलास. अजून खूप काही करायचं होत
तुला. शेवटपर्यंत सुख नावाची गोष्ट तुझा आयुष्याने कधी पहिलीच नाही. तुझ्या जाण्याने
कोणी काय गमावलं माहित नाही. पण एक नक्की ताई-दादांनी त्यांच्या जगण्याची आस आणि मी
माझ्या मैत्रीचं सर्वस्व गमावलं. आज तुझ्या दहाव्याला घरी आलो तेव्हा साऱ्या आठवणी
अंगावर आल्या. ज्या समाजमंदिरात आपण गप्पा मारल्या त्याच समाजमंदिरात तुझा फोटोला
फुलं वाहतांना काळजाचं पाणी झालं. ताई-दादांकडे पाहताना तुझी प्रतिमा नजरेसमोरून
हलत नव्हती. तुझ्या दहाव्याच्या जेवणाचा घास घशातून खाली उतरत नव्हता. राहून राहून
तुझा माझा एका ग्लासचा अर्धा अर्धा चहा आठवत होता. काळजाला चटका लावून तुझं निघून
जाणं आजही खरं वाटत नाही. अजूनही वाटतं कधीही तुझा फोन येईल आणि तू म्हणशील- “बाबूमोशाय...
जिंदगी....!”
No comments:
Post a Comment