सिनेमा- केवळ मनोरंजन नव्हे तर विचार मांडण्याचे माध्यम असतं असं म्हटलं आणि आजकालचे बॉलीवूडचे सिनेमे पहिले तर हे वाक्य थाप वाटावी असं सत्य. पण अधेमधे कुणीतरी राजू हिरानी सारखा दिग्दर्शक हि ‘थाप’ अगदी सत्य ठरवून जातो. येणार येणार अशी ज्याची गेली अनेक महिने चर्चा होती तो ‘PK’ अखेर आला. मुळात राजकुमार हिरानीचा सिनेमा, त्यात पुन्हा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान असल्याने या सिनेमाची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. सिनेमाची कथा अजिबातच ‘LEAK’ होता कामा नये याची दाखल अत्यंत जाणीवपूर्वक घेतली गेली आणि इथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली. राहिला प्रश्न चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा तर सिनेमा पाहतांना आमीर सोबतच समोरच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या भुवया उंचावलेल्या आणि डोळे विस्फारलेले राहतात यातच सारं आलं. कथेचे वेगळेपण, पुढे काय हि उत्सुकता, मांडणीची पद्धत, कथेची गुंफण, राजू हिरानीचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय या साऱ्यांचे अत्यंत शिताफीने केलेले मिश्रण म्हणजे हा सिनेमा. शीर्षक जितके हटके तितकाच चित्रपटही हटकेच. पुन्हा एकदा या जोडगोळीने कमाल दाखवत ‘करोड क्लब’च्या नव्या विक्रमाला हात घातला आहे. या सिनेमात वापरलेला ‘वेगळा चष्मा’ हि सर्वात जमेची बाजू ठरते.
राजू हिरानीने नेहमीप्रमाणे कथेचे वेगळेपण इथेही कायम जपले. मानव आणि एलियन या अजब नात्याचा सिनेमातील एक पदर म्हणून चांगला वापरला. सिनेमाच्या सुरुवातीलाच आमीर एक एलियन म्हणून पृथ्वीवर येतो. हीच सुरुवात मग आता पुढे काय हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. एलियनच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा सारा प्रवास दिग्दर्शकाने विनोदी शैलीत पण अनेक प्रश्न उभे करत मांडला आहे. सिनेमा पूर्ण विनोदी असला तरी तो आजच्या समाजावर केलेला विनोद आहे. तिथे दिग्दर्शक आपल्या मांडणीची छाप निश्चित सोडून जातो. आमिरच एलियन असून इथल्या रंगरूपात परावर्तीत होणं, त्याच्या माणूस म्हणून जगण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा, अनुष्का शर्माचं(जग्गू) पत्रकार म्हणून भेटणं, तिने एलियनची न्यूज स्टोरी म्हणून वापर करणं, त्यातून जुनेच पण नव्याने उभे राहणारे प्रश्न या सगळ्याची गुंफण लाजवाब झाली आहे. राजू हिरानीने स्वतःच एडिटरची कात्री हातात धरल्याने सिनेमाचा प्रत्येक सीन अगदी विचारपूर्वक तोडला आणि जोडला गेलाय. कुठेच छोटा देखील जंप कट जाणवत नाही. खुर्चीला खिळवून ठेवणारे एडिटिंग करण्यात तो यशस्वी झाला आहे. सिनेमा कुठेही रेंगाळणारा वाटत नाही उलट उत्सुकता वाढवतच जातो.
कलाकारांचा अभिनय हि मोठी बाजू नेहमीच हिरानीच्या सिनेमाची शक्ती असते. बोमन इराणी, सौरभ शुक्ला, संजय दत्त, सुशांत राजपूत यांच्या भूमिका कमी लांबीच्या असल्या तरी त्या पूर्ण ताकतीने कलाकारांनी रंगवल्या आहेत. अनुष्का शर्मा हिची दुय्यम भूमिका असली तरी तिने ती उत्तम पेलली आहे. तिचा स्पेशल लूक सुद्धा भाव खावून जातो. विशेषतः अनुष्काने या सिनेमात आपली स्वतंत्र छाप सोडली आहे हे मान्य करावेच लागेल. राहिला तो आमिरचा प्रश्न. मि. परफेक्शनिस्ट हे वेगळचं रसायन आहे हे पुन्हा सिध्द झालं. त्याने नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत सहजपणे जाणवून येते. त्याचे डोळे आणि केवळ चेहऱ्यावरील हावभाव संपूर्ण चित्रपट व्यापून टाकतात. त्याचा तो चेहरा त्याला अप्रत्यक्षपणे सामान्य मानवापेक्षा वेगळा लूक मिळवून देतात. आपल्या कल्पनेतला एलियन नाही आणि अगदीच आपल्यासाराखाही नाही असा काहीसा PK साकारण्यात तो यशस्वी ठरलाय. आमिरचा सिनेमा म्हटलं कि मग साहजिकच त्याच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात, या अपेक्षा तो तंतोतंत पूर्ण करतांना दिसतो.
पण या साऱ्यांपेक्षा कौतुक करावेसे वाटते ते राजू हिरानीचेच. एक अफलातून कल्पना त्याने खूप विनोदी ढंगात दाखवली. चित्रपटातील सर्वात वेगळी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या समाज जीवनावर केलेले व्यंग! दिग्दर्शक म्हणून त्याने या विषयाला यशस्वी गवसणी घातलीच पण तो विषय त्याने कोळून प्यायला आहे असेच वाटते. आपल्या आजूबाजूच्या धार्मिक जीवनावर अत्यंत सफाईदारपणे टीका त्याने केली मात्र ती विनोदिशैलीत. हि गुंफण फार अवघड होती मात्र त्याने ती लीलया पेलली. अगदी हिंदू विधवा – पांढरारंग – ख्रिश्चन मॅरेज – फ्युनरल – काळा रंग – मुस्लीम महिलांचा बुरखा हा सारा कोलाज त्याने पडद्यावर शिताफीने मांडत बोचरी टीका सुद्धा केली. दुसर्या एका सीन मध्ये हिंदू देवेता – नारळ अगरबत्ती – येशू – वाईन – मस्जिद हा प्रवास करतांना आपल्या परस्पर विरोधी प्रथांना चिमटा काढायला विसरला नाही. हि सारी किमया त्याने विचारांची मोन्ताज पद्धत वापरून केली. ‘रॉंग नंबर’, ‘ठप्पा’ अशा विविध खोचक शब्दातून मानवाच्या धर्मातील विभाजनावर सणसणीत वार केलेत.
मी सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे त्याने या चित्रपटात वापरलेला ‘चष्मा’ हाच या चित्रपटाचा आत्मा आहे. हा चष्मा म्हणजे आपल्याच समाजाकडे त्रयस्थ म्हणून एलियनच्या नजरेतून पाहणे. इथले धर्म, जाती, पंथ, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अमूर्त विश्वास यांच्याकडे पाहण्यासाठी आणि आपल्याला ते दाखवण्यासाठी हा चष्मा वापरला. या चष्म्यातून पाहतांना हे सारे कसे धार्मिक थोतांड वाटते याची प्रचीती इथे येते. अगदी नोटेवरचे गांधीच फक्त महत्वाचे आणि इतर कुठल्याच कागदावरले गांधी महत्वाचे नाही हे सूचक वक्तव्य अत्यंत सहज व सुंदर पद्धतीने त्याने मांडले.
निश्चितच हा सर्व प्रकार त्याने अत्यंत धाडसाने, अभ्यासाने व अपार कष्टाने मांडला आहे. प्रत्येक सीन मध्ये विनोदापलीकडे एक-एक गोष्ट त्याने अत्यंत मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त त्या विनोदामागची टीका ज्याला कळली आणि आपसूक तोंडातून वाह! शब्द बाहेर पडला, त्यालाच राजू हिरानीचा हा अफलातून प्रयत्न कळला. फक्त भीती एकच वाटते ती म्हणजे, त्याने समाजजीवनाच्या थोतांडावर केलेल्या भाष्यावरच्या विनोदी आवरनालाच जर प्रेक्षक भुलला तर मात्र त्याचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि इतका सुंदर प्रयोग केवळ मनोरंजन म्हणून उरेल. म्हणूनच मी त्याला ‘डायल केलेला परफेक्ट रॉंग नंबर’ म्हटले, फक्त लोकांनी नेमकेपणाने तो ‘रिसीव्ह’ करावा एवढीच त्याचीही आणि माझीही अपेक्षा....
राजू हिरानीच्या या अफलातून प्रयोगाला सलाम.....
Monday, December 22, 2014
‘PK’- डायल केलेला परफेक्ट ‘रॉंग नंम्बर’
Subscribe to:
Post Comments (Atom)
सुंदर लेख.
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete